बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि इतर बारा जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
५ मार्चला मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान त्यांच्या याच दौऱ्यात त्यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसतांना देखील रॅली काढून जीसीबीने धोकादायक पद्धतीने फुल उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर आणि पेठ बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यासह इतर बारा जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.