परभणी : परभणी येथील पूर्णा तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बरबडी गावातील अंगणवाडी सेविकेने गावाशिवारातील विहरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वनिता रामराव शिंदे (वय-४३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी अर्जुन रामराव शिंदे यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरबडी येथील अंगणवाडी सेविकेने सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेतकरी बालाजी कुंडलिक शिंदे यांच्या शेतीतील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. पोलिस निरीक्षक विलास गोबडे, पोलिस निरीक्षक प्रकाश शिंदे, अमर चाऊस यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे.
दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास अमर चाऊस करीत आहेत.