जालना : जालना रेल्वे स्थानक परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. इथे एका नराधमाने तरुणाला धमकी देत त्याच्या होणाऱ्या पत्नीवर अत्याचार केला आहे. बुधवारी रात्री नऊ वाजता हे भावी पती-पत्नी चालत येत होते. यावेळी अंधारातून आलेल्या आरोपीनं दोघांना थांबवलं. दोघांशी दमदाटी केली. यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला भुयारी पुलाजवळ अंधारात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी रात्री होणारा पती जालना रेल्वे स्थानक परिसरात थांबला होता. त्याची होणारी पत्नी डबा देण्यासाठी तिथे आली होती. रात्री नऊच्या सुमारास दोघंही पायी चालत घरी परत जात असताना. दरम्यान, तरुणीच्या ओळखीचा प्रेम रवी पाचगे त्याठिकाणी आला. त्याने जोडप्याला अडवलं. मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत तरुणीचा हात धरून तिला अंधारात घेऊन गेला. तसेच जागेवरून हलला तर जीवे मारेन, अशी धमकी आरोपीकडून तिच्या होणाऱ्या पतीला देण्यात आली.
नाल्यात घेऊन जात लैंगिक अत्याचार..
यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला भुयारी पुलाजवळ असलेल्या नाल्यात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर दोघांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने घटनास्थळी दाखल झाले आणि तपास गतिमान केला.
बुधवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी अवघ्या ४ तासांत नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने आरोपीला २९ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.