जालना : भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताडमधून एक काळजाला भिडणारी घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी पैसे नसल्याने तसेच मराठा आरक्षण असते तर खर्च कमी लागला असता, या विचारातून एका विद्यार्थिनींनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. शिवानी संजय हिवाळे (वय-18) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना बुधवारी १२ जुलै रोजी सांयकाळी देऊळगाव ताड येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवनी ही अभ्यासात हुशार असल्याने तिने बारावीत ७२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. आतापर्यंत तिचे शिक्षण तिच्या मामांनी पूर्ण केले होते. यापुढे खुप शिकावे ही तिची इच्छा होती. तिला बी.ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घ्यायचा होता.
मात्र, तिच्या घरची परिस्थीती नाजूक असल्याने पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च पेलू शकत नव्हती. तसेच मराठा आरक्षण असते तर खर्च कमी लागला असता. त्या विचारातून शिवणीने टोकाचे पाऊल उचलत घरा जवळच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.