जालना : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आक्रमक होत थेट रस्त्यावर उतरत धुळे-सोलापूर मार्ग अडवला आहे. वडी गोद्री येथे ओबीसी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसून उपोषणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप करत ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जालन्यात रस्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. जालन्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. आंदोलकांनी रस्ता रोखून धरला असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असाच सुरु राहणार, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलकांनी हातात पिवळ्या रंगाचे झेंडे घेत “एक पर्व, ओबीसी सर्व”, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्र आले होते. तर सरकारने लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान या रास्ता रोको मुळे वाहनांचा खोळंबा झाला आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आता महामार्गापासून आंदोलकांना बाजूला केल्याची माहिती समोर येत आहे.