Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर रस्ता ओलांडताना ज्येष्ठ महिलेला ट्रकने दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. 13) हि घटना घडली.

अन्नपूर्णा गुरु (वय -64, रा. मोरया सोसायटी, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याबाबत अन्नपूर्णा यांचा मुलगा अभिजित (वय -39) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा गुरु या गुरुवारी पुणे-सोलापूर महामार्गाने निघाल्या होत्या. त्या वेळी कुंजीरवाडी परिसरात रस्ता ओंलाडणाऱ्या अन्नपूर्णा यांना भरधाव ट्रकने धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
दरम्यान, अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत. लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठवडाभरात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.







