बीड : अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती दीड लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.२१) दुपारी बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे परत जिल्ह्यातील लाचेचा प्रकार उघड झाला आहे. बीड जिल्ह्यात लाच घेण्याचे प्रकार वाढले असून शासकीय कामासाठी काही भ्रष्ट अधिकारी राजरोसपणे पैसे मागताना व घेताना दिसत आहेत.
बीडचे मंडळ अधिकारी सानप यांना दीड लाखांची लाच घेताना एसीबीने पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलात करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात लाचखोरीचे प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. प्रत्येक घटनेत लाखांपेक्षा अधिकच लाचेची मागणी होत असल्याने जिल्हयासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मंडळ अधिकारी सचिन सानप यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.