छत्रपती संभाजीनगर : उपचारासाठी शहरात येताना गेवराई तालुक्यातील तरुणाचा सुसाट हायवाखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सचिन भागवत पानखेडे असे मृत तरुणाचे नाव आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील आडगावजवळ हा अपघात झाला आहे. मूळ गेवराई तालुक्यातील राजपिंपरीचे रहिवासी असलेले सचिन हे वडील, चुलत भावासह कारने सोलापूर-धुळे महामार्गाने वडिलांच्या उपचारासाठी शहरात येत होते.
झाल्टा फाटाच्या आधी आडगाव उड्डाणपुलाजवळील सर्व्हिस रोडवर लघुशंकेसाठी थांबून सचिन पुन्हा कारच्या दिशेने जात असताना, शहराच्या दिशेने येणाऱ्या हायवाने त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी धाव घेतली, परंतु सचिन यांचा जागीच मृत्यू झाला होता.
अधिक माहिती अशी की, सचिन हे शेतकरी असून त्याच्या वडिलांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. स्थानिक रुग्णालयात त्यावर उपचार होत नसल्यानं शहरात उपचारासाठी न्यायचं ठरवलं होतं. सचिनचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. सचिनसोबत त्याचा भाऊसुद्धा होता. भाऊ आणि वडिलांसमोरच सचिनला सुसाट हायवाने फरफटत नेलं.
हे सर्व झाल्टामार्गे ते शहरात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आडगावच्या सर्विस रोडने येताना त्यांनी कार रस्त्याकडेला लघुशंकेसाठी उभी केली होती. ते कारकडे परत येत असताना वाहनाने त्यांना धडक दिली. यानंतर त्यांना १०० फूट फरफटत नेलं. तेव्हा कारमध्ये बसून असलेले सचिनचे भाऊ आणि वडील या दोघांच्या डोळ्या देखत सचिनचा मृत्यू झाला.
अपघातावेळी डंपरचा वेग इतका होता की सचिनला धडकल्यानंतर गाडी जवळपास १०० फूट पुढे गेली. अपघातानंतर हायवाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.