परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील भोपळा येथील लघु तलावातील पाण्यात पोहायाला गेलेला एक युवक बुडाला असून शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. ही घटना आज (दि.19) बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गणेश माणिकराव फड (वय-२२ रा. कन्हेरवाडी ) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. गणेश हा पुणे येथे आभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून गेल्या पंधरवड्यात तो आपल्या गावाकडे सुट्टी साठी आला होता.
गणेश फडचा शोध घेण्यासाठी नगरपालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, दुपारपर्यंत युवकाचा शोध लागलेला नव्हता. तसेच परभणी जिल्ह्यातील मानवत येथील पोहणाऱ्याची टीम ही तलावात दुपारी १२ पासून उतरून शोध घेत आहेत. घटनास्थळी परळी तहसीलदार व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
परळी-अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या भोपळा गावाजवळील तलावात पाणी भरपूर असल्याने परिसरातील अनेक जण या तलावात पोहण्यासाठी येत असतात. त्याप्रमाणेच आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास गणेश आपल्या काही मित्रासोबत भोपळा तलावात पोहण्यासाठी आला होता. पोहत असताना मित्र पुढे गेले आणि गणेश मागे राहिला. त्यानंतर गणेश फड बेपत्ता झाल्याचे समजले.
गणेश बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच अनेकांनी तलावात गणेशचा शोध घेतला. तसेच नपच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. प्रशासनाकडून प्रयत्न जारी आहेत अशी माहिती परळी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे यांनी दिली.