बीड : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील मुख्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेत (CID) नेमणुकीस असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने बीडमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
सुभाष दुधाळ असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे, त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. रेल्वेखाली उडी घेतल्यानंतर त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. बीडच्या परळी रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी कौटुंबिक कारणामधून हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष दुधाळ यांची काही दिवसांपूर्वीच बीडमधून पुणे येथे सीआयडीमध्ये बदली झाली होती. दुधाळ यांनी सीआयडीमध्ये हजर झाल्यानंतर १० दिवसांची रजा टाकली होती. त्यानंतर ते बीड येथे गेले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह बीड जिल्ह्यातील परळी येथे रेल्वे रुळावर दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिक लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर त्यांचा मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये ‘सुभाष दुधाळ, पीआय, सीआयडी, व्हीडब्ल्यूटी), मी कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या करीत आहे.’ असे लिहिलेले होते. तर दुसऱ्या कागदावर घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. दरम्यान, सुभाष दुधाळ यांच्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.