नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल जाधव आणि त्याची पत्नी अर्चना यांच्यात मध्यरात्री कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर विशाल जाधव याने विनापरवाना गावठी कट्ट्यातून पत्नीवर सलग तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.

या गोळीबारात एक गोळी महिलेच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी तिच्या पाठीत लागली. गंभीर जखमी झालेल्या अर्चना यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेनंतर आरोपी विशाल जाधव फरार झाला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवरही पोलीस तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत.
या घटनेनंतर लोहा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अवैध शस्त्रांचा वापर आणि वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.







