मुंबई: राज्यातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहनधारकांना 31 डिसेंबर 2026 पूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. मुदत संपल्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, साध्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा काही गुन्हेगारी घटनांमध्ये गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. अशा वाहनांची ओळख पटवताना पोलिसांना अडचणी येत असल्याने HSRP प्लेटचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत जवळपास 1 कोटी वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. नवीन वाहनांना शोरूममधूनच HSRP प्लेट देण्यात येतात. मात्र, जुन्या वाहनांपैकी अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहनांवर ही प्लेट बसवणे बाकी आहे.

सध्या जुन्या वाहनांपैकी केवळ 55 ते 56 टक्के वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवल्या आहेत. त्यामुळे उर्वरित वाहन मालकांनी दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे.
HSRP नंबर प्लेटच्या नियमांमध्ये कोणालाही विशेष सूट मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री, खासदार, आमदार किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी असले तरी सर्वांच्या वाहनांवर ही नंबर प्लेट असणे आवश्यक आहे. नियम सर्वांसाठी समान असतील, असे सरनाईक यांनी सांगितले.
31 डिसेंबरनंतर HSRP प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही नियमभंग केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे.
परिवहन विभागाने वाहनधारकांना वेळेत HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले असून, भविष्यात वाहनांची सुरक्षित ओळख आणि गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे.







