पुणे: कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी साताऱ्याला गेलेल्या पुणे पोलिसांच्या तीन कर्मचाऱ्यांवर गंभीर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तपासाच्या नावाखाली गेलेल्या या पोलिसांनी तक्रारदार महिलेला सोबत घेऊन साताऱ्यात पर्यटन स्थळांना भेट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाच्या तपासासाठी 4 एप्रिल रोजी तीन पोलीस कर्मचारी संबंधित तक्रारदार महिलेसह साताऱ्याला गेले होते. नियमानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन चौकशी करणे अपेक्षित होते. मात्र, या कर्मचाऱ्यांनी तपासाऐवजी इतर गोष्टींना प्राधान्य दिल्याचे चौकशीत समोर आले.

साताऱ्यात पोहोचल्यानंतर त्यांनी एका ढाब्यावर वेळ घालवला. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. मात्र, ज्या ठिकाणी तपासासाठी गेले होते, तेथे आवश्यक चौकशी किंवा तपास प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठार आणि इतर पर्यटनस्थळांना भेट दिली.

या संपूर्ण प्रकारात तक्रारदार महिला मानसिक तणावात होती. तिच्या घरी आजारी रुग्ण असल्याने तिने पोलिसांना लवकर पुण्यात परतण्याची विनंती केली होती. मात्र, तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी पर्यटन केल्याचा आरोप आहे.
पुण्यात परतताना हे कर्मचारी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जेवणासाठी थांबले आणि रात्री उशिरा शहरात पोहोचले. त्यानंतर महिलेला थेट घरी न सोडता स्वारगेट परिसरात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेच्या विनंतीनंतर तिला मध्यरात्री नारायण पेठ पोलीस चौकीत सोडण्यात आले.
प्रकरण समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी अंतर्गत चौकशी केली. चौकशीत तिन्ही कर्मचारी दोषी आढळले. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी कारवाई करत तिन्ही कर्मचाऱ्यांची 2 वर्षांची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.







