बार्शी: गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण आले आहे. बर्गे यांनी प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली नर्तिका पूजा गायकवाड हिची पोलीस कोठडी आज संपत आहे. तिला आज बार्शी न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार असून, तिच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की तिला न्यायालयीन कोठडी मिळेल, हे स्पष्ट होईल.

आर्थिक लुटीचा संशय
या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. पूजा गायकवाडने बर्गे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक लूट केली असा संशय पोलिसांना आहे. याआधी मिळालेल्या माहितीनुसार, पूजाने बर्गे यांच्या पैशांतून बार्शी परिसरात 1.75 गुंठे जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या खरेदीखतावर तिच्या भावाने साक्षीदार म्हणून सही केल्याचेही समोर आले आहे. आता पोलिसांना पूजाने तिच्या मावशीच्या नावावर वैराग परिसरात 3 एकर जमीन खरेदी केल्याचा संशय आहे.

मावशीच्या नावाने जमीन खरेदी?
पोलीस तपासात समोर आले आहे की, पूजा मावशीकडे राहत होती. त्यामुळे, तिने मावशीसाठीच गोविंद बर्गे यांची आर्थिक लूट केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. या 3 एकर जमिनीसाठी बर्गे यांनीच पैसे दिले होते का? आणि ते कसे दिले? याबद्दल पोलीस बँक व्यवहारांची तपासणी करत आहेत. पोलिसांनी या जमिनीच्या मूळ मालकाचीही चौकशी केली आहे. बार्शी पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.







