नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या २५ दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास देगलूर शहरातील फुलेनगर येथे घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला देगलुर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेषेराव सुदाम भुरे (वय-३७) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकं प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देगलूर शहरातील फुले नगर येथे वास्तव्यास असलेल्या महिलेचा पती दोन वर्षांपूर्वी मरण पावला होता. त्या दोघांना एक ६ वर्षांची मुलगी आणि एक ४ वर्षाचा मुलगा असे दोन मुले होती. दरम्यान, नात्याने चुलत दिर असणाऱ्या शेषेराव भुरे याच्यावर प्रेम जडले. त्यातून ती गर्भवती झाली.
११ जुलै रोजी महिलेने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिला तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ती आपल्या तीन मुलांसह फुलेनगर येथे रहायला गेली. मात्र, शेषेराव त्या मुलीला जन्म दिल्या पासून रोज संपवण्याची भाषा करत होता. असं असताना ही महिला त्याला सतत विरोध करत होती. मात्र, ३ ऑगस्ट रोजी रात्री अडीज वाजता तीची मोठी मुलगी रडत होती. या आवाजाने महिला जागी झाली. यावेळी शेषराव भुरे हा २५ दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळत होता. तेव्हा त्याच्याकडून बाळ हिसकावून घेत त्याला दुध पाजण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तिने कसलीच हालचाल केली नाही. भुरे याने बाळाला हिसकावून घेवून त्याचा मृतदेह एका पिशवित घालून बाहेर घेऊन जात फेकून दिला. आणि सकाळी ६ वाजता परत घरी परतला. या सर्व प्रकारानंतर ५ ऑगस्ट रोजी एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांतर पोलिसांनी आरोपीच्या घरी जावून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंझारे हे करीत आहेत.