नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वच थरातून प्रयत्न सुरु आहेत. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना आत्महत्या करू नका असं आवाहन केलं आहे. मात्र समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील सोमेश्वर गावातील नववीत शिकणाऱ्या विध्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोमल तुकाराम बोकारे असं तरुणीचं नाव आहे.
इयत्ता नववीत शिकणाऱ्या कोमलने स्वतःच्या घरात जीवन संपवलं आहे. तिने चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे, माझा बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा, असं कोमलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी ही पाचवी आत्महत्या आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. फक्त एक एकर शेती असून घरात एकुण पाच मुली आहेत. दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील करत आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने बोकारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेने नांदेड जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय आहे चिट्ठीत
कोमलने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिट्ठीमध्ये तिनं म्हटलं आहे की, “मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावं, माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा…” अशी भावनिक साद मराठा सामाज्यासाठी तिने घातली आहे’