मुंबई : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी लवकरच 62 वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबती मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी ही वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.
या ठिकाणी सुरू होणार प्रत्येकी 2 वसतिगृहे बीड जिल्हा वडवणी, धारूर, शिरूर कासार, आष्टी, अंबाजोगाई. अहमदनगर शेवगाव, जालना परतूर, बदनापूर, जालना, मंठा, नांदेड कंधार, परभणी, गंगाखेड, मुखेड, लोहा, पालम, सोनपेठ, धाराशिव कळंब, भूम, परांडा, लातूर रेणापूर, जळकोट, छत्रपती संभाजी नगर पैठण, सोयगाव, सिल्लोड, नाशिक निफाड, नांदगाव, येवला, सिन्नर, जळगाव एरंडोल, यावल, चाळीसगाव.
सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याबाबतचा शासन निर्णय सांगितला आहे. या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करून त्यात 100 क्षमतेचे मुला-मुलींसाठी स्वतंत्र असे एकूण 82 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना घेतला होता. तसेच त्यांच्या कार्यकाळात बीड, अहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू देखील करण्यात आली. यांपैकी आतापर्यंत 5 वसतीगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी देखील शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यात यावेत, याबाबत धनंजय मुंडे यांनी सध्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. त्यानुसार आता आणखी 31 तालुक्यात 62 वसतिगृहे उभारण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ही वसतिगृहे सुरुवातीला भाड्याच्या जागेत, नंतर टप्प्याटप्प्याने वसतिगृहे स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवली जातील.