जालना : जालन्यात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन एका पाच वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी वाडी भागात ही घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडला. समर्थ तायडे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे. चिमुकल्या समर्थच्या मृत्यूने तायडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या आमठाणा येथील तायडे कुटुंब हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी कुंभारी वाडी गावात आलं होतं. यावेळी मुलांसोबत खेळताना पाच वर्षाच्या समर्थने मोबाईलची खराब बॅटरी कानाला लावली. त्याच क्षणी मोबाईल बॅटरीचा स्फोट झाला. या घटनेत समर्थच्या कानाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे तायडे कुटुंबियांनी तात्काळ समर्थला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने कुंभार वाडी गावावर शोककळा पसरली आहे.
मामाच्या घरी आला आणि घात झाला
समर्थ परशुराम तायडे हा कुटुंबियांसह भोकरदन शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारी वाडी गावात मामाच्या घरी आला होता. तायडे कुटुंबिय हे गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रमासाठी आले होते. मात्र हा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वीच झाला होता. ४ मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मूळ गावी आमठाणा येथे परतणार होते. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली. समर्थने खराब झालेली बॅटरी खेळताना कानाला लावली आणि त्याचा स्फोट झाला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.