लातूर : लातूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका 24 वर्षीय तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या घटनेने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. ही घटना लातूरच्या आर्वी परिसरात घडली आहे. ऐश्वर्या चव्हाण असं या तरूणीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या ही पेशाने नर्स होती. ती लातूर येथे एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. त्याच वेळी लॅब टेक्निशियन असलेल्या अविष्कार माने या तरूणा बरोबर तिची ओळख झाली होती. दोघांमध्ये चांगली मैत्रीही झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. दोघांनीही लग्न करण्याचेही ठरवले होते. गेल्या काही महिने त्या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चाललं होतं.
लग्न करणार आहे असं सांगून अविष्कारने तिला फसवले असा आरोप ऐश्वर्याच्या कुटुंबीयानी केला आहे. लग्न करावे यासाठी तिने तगादा लावला होता. पण तो वारंवार लग्नाचा विषय काढला की बोलणे बंद करत होता. अखेर त्याने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे ऐश्वर्याला मानसिक धक्का बसला. त्यामुळे नैराश्यातून तिने राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
दरम्यान, ऐश्वर्या ही आत्महत्या करण्यापूर्वी अविष्कार हा तिच्याबरोबर बोलत होती, असं तिच्या भावाने सांगितले. त्याच वेळी दोघांमध्ये खटकेही उडाले. त्यात तिने आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचललं. यापाराकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.