धाराशिव : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा तालुक्यातील येणेगुरजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या दुधाच्या टँकरने शाळकरी विद्यार्थिनींना जोरदार धडक दिली आहे. या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाली आहे. श्रेया सुरेश पाञे असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून श्रद्धा श्रीकांत कांबळे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थिनी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. बुधवारी सकाळच्या वेळी दोघीही शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. याचवेळी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा तालुक्यातील येणेगुरजवळ भरधाव वेगात आलेल्या दुधाच्या टँकरने त्या दोघींना जोरदार धडक दिली. हा धडकेत श्रेयाचा जागीच मृत्यू झाला. तर श्रद्धा गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्नालाय्त उपचार सुरु आहेत.
अपघातानंतर टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तसेच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत थेट रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं आहे. रस्ता खराब असल्याने असे भयंकर अपघात होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. जिल्हाधिकारी येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.