छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मित्रानेच लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. नितीन वाघ असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी नितीन आणि पीडित मुलीची पंधरा दिवसांपूर्वी ओळख झाली होती. पीडितेला विश्वासात घेऊन आरोपीने तिला उस्मानपुऱ्यातील येथील एका कॅफेवर भेटण्यासाठी बोलावले. पीडिता कॅफेवर गेली, त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यावेळी आरोपीने मुलीसोबत अश्लील फोटोही काढले. याच फोटोंच्या आधारे आरोपीने पीडितेला धमकावत सातारा परिसरातील एका हॉटेलात बोलावून घेत तिथे पुन्हा आरोपी नितीन याने पीडितेवर दुसऱ्यांदा लैंगिक अत्याचार केला.
या संपूर्ण प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. यानंतर तिने घडलेल्या सर्व प्रकार आईला सांगितला. आईने ३१ डिसेंबर ला सातारा पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी नितीन वाघ याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सोमवारी नितीनला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.