अहमदपूर (लातूर) : तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील शेतकरी शिवदास घुगे यांच्या शेतात नऊ फूट लांब आणि १५० किलो वजनाची नर जातीची मगर आढळून आल्याने गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु, वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी व सर्पमित्रांनी त्या मगरीस पकडण्यासाठी कसून प्रयत्न केले. तब्बल दोन तासानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
ब्रम्हवाडी येथील शेतकरी शिवदास घुगे यांना त्यांच्या शेतात भली मोठी मगर दिसताक्षणी ते घाबरून केले. त्यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर अहमदपूरच्या वनपरिक्षेत्र कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ ब्रम्हवाडी येथे जाऊन घुगे यांच्या शेतातील परिस्थितीची पाहणी केली. वनपरिक्षेत्र वरिष्ठ अधिकारी अश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शानाखाली टीम तयार करण्यात आली.
वनपरिमंडळ अधिकारी गोंविदराव माळी, राम केसाळे, जी.बी. काळे, वनरक्षक भीमराव गडकर, विश्वनाथ होनराव, राठोड, भाऊसाहेब अंबुलगेकर, मीरा बोंबले, सर्पमित्र सिद्धार्थ काळे, आशिष कलुरे, उद्धव देगलूरे, योगेश तेलंगे, कान्हा पांचाळ या कर्मचाऱ्यांनी मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन केले. पशुधन विकास अधिकारी डॉ. सुयोग येरोळे यांनी मगरीची वैद्यकिय तपासणी केली. सदरील मगर ही नर जातीची असून त्याचे वय अंदाजे १० ते ११ वर्ष आहे. या मगरीचे वजन १५० किलो असून लांबी नऊ फूट इतकी आहे. ही मगर विशेष वाहनाने पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.