छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे एटीएमला आग लागून जवळपास 13 ते 15 लाख जळून राख झाल्या आहेत. सोमवारी पहाटे 4.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
सोमवारी पहाटे 4.15 वाजेच्या सुमारास एका कारमध्ये तीन ते चार अज्ञात चोरटे आले. त्यांनी कार बँकेसमोर उभी करून तोंडाला कपडा बांधलेल्या दोन व्यक्तींनी एटीएममध्ये प्रवेश करून शटर बंद केले. त्यानंतर त्यातील एका व्यक्तीने एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व सोबतच्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशिन कापणे सुरू केले.
गॅस कटरची नळी फिरली आणि..
मशिनचा पुढील भाग कापला गेला. मात्र, एटीएम मशिनचा आतील भाग तसाच असल्याने गॅस कटरची नळी फिरली आणि त्यात गॅस कटरची ठिणगी पडली. त्यामुळे एटीएममधील जवळपास 13 ते 15 लाख रुपयांची रक्कम जळून खाक झाली. यानंतर बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. काही वेळात तेथील सायरन वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे बँकेच्या आसपास राहणारे काही ग्रामस्थ घराबाहेर निघाले. ही बाब चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी गॅस कटर मशिन व अन्य साहित्य तिथच ठेवून घटनास्थळावरून पळ काढला.
सीसीटीव्ही फुटेज केला जप्त..
चोरट्यांनी एटीएममधील एक सीसीटीव्ही कॅमेरा तोडला तो बंद होता. त्याच्या बाजूला दुसरा डिजिटल कॅमेरा होता, त्या कॅमेऱ्यात ही घटना चित्रीत झाली असून पोलिस तपासासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.