बीड : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली. शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियानासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या अभियानाला न जुमानता सर्रास कॉपी करण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. पहीलीच घटना बीडमध्ये पहायला मिळाली.
राज्यात अद्यापही कॉपी पुरवण्याचे प्रकार सुरु असून, नुकत्याच सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्येही हे चित्र पाहायला मिळाले. तेलगाव येथील सरस्वती विद्यालयांमध्ये बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला कॉपी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इथं परीक्षा केंद्र असणाऱ्या महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळाले. कॉपी पुरवण्यासाठी परीक्षा केंद्रांबाहेर मोठी गर्दी होती.
बारावीच्या परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी सर्वच परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही सरस्वती महाविद्यालयाच्या पाठीमागच्या परिसरातून जीव धोक्यात घालून भींत ओलांडून अनेकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचे पाहायला मिळाले.