छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार असून मतदानासाठी मतदारांचे नाव यादीत असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या बारा ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असेल तर त्यांना मतदान करता येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने फोटो असलेले मतदार ओळखपत्र आणि इतर बारा ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील. अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीसाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर बारा पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला र्जाइल. या पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र अथवा राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले ओळखपत्र, खासदार, आमदारांनी जारी केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे बारा पुरावे ग्राह्य धरले जाणार आहे.