छत्रपती संभाजीनगर : राज्यात लाडकी बहीण योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. एक कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम पण जमा झाली. मात्र आता या योजनेचा काहीजण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकरणं उघडकीस येत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलांचे फोटो लावून स्वत: अर्ज भरल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी कारवाईसाठी प्रस्ताव पाठव्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलेचे फोटो लावून स्वतःचा अर्ज भरल्याची बाब महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यात 12 अर्ज असे आले होते, स्क्रुटिनीच्या वेळी ते अर्ज पुरुषांचे असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे ते रिजेक्ट करण्यात आले आहेत. यात आधार कार्ड महिलांचं आणि नाव पुरुषाचं होतं, अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकारी रेश्मा चिमंद्रे दिली आहे.
बहीणींच्या पैशावर डोळा ठेवणाऱ्या या 12 भावांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेल्या पोर्टलवर स्वत:च्या आधारकार्डाचा फोटो अपलोड केला. तसेच त्यांनी हमीपत्रामध्येही स्वत:चं नाव लिहिलं आहे. मात्र फोटो अपलोड करताना त्यांनी महिलांचा फोटो वापरला होता. सविस्तर तपशील तपासला जाणार नाही असा या लोकांचा अंदाज होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला आणि पडताळणीदरम्यान हा बनाव उघडकीस आला. या प्रकरणामध्ये आता चौकशीचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले असून त्यातील 90 हजार 957 मंजूर करण्यात आले आहेत, तसेच तांत्रिक कारणाने 428 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत, तर 357 रद्द केले आहेत. दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या स्वीकृतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या अर्जाची या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता हा प्रकार समोर आला आहे.