अंबाजोगाई : तालुक्यातील दस्तगीरवाडी येथे घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याच्या दागिन्यासह इतर साहित्य असा १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला. दस्तगीरवाडी येथील शिवकन्या नवनाथ फड या आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. घराला कुलूप लावल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.
यावेळी चोरट्यांनी घरातील फिलीप्स कंपनीची एलईडी टीव्ही, एलजी कंपनीचा फ्रिज, १० ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, सोन्याची बारीक मन्याची पोत, दोन सोन्याच्या अंगठया असा १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी शिवकन्या नवनाथ फड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.