Ajit Pawar : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असून आरक्षण आम्ही घेणारच असा आग्रह मराठा समाजानी लावून धरला आहे. दुसऱ्या बाजूला, ज्या मराठा कुटुंबांकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे.
मात्र, त्यासाठी ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. यामुळे मराठा आणि ओबीसी असा संघर्ष राज्यात जोर धरत आहे. या संघर्षावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच भाष्य केलं आहे. राज्य सरकारचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, आम्ही सर्वजण एकोप्याने राज्यातल्या सर्व जाती आणि धर्मांना आपल्याबरोबर घेऊन कसं पुढे जाता येईल ते पाहतोय. महाराष्ट्रात जातीजातींच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. सकल मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे. धनगर समाज, आदिवासी समाज, ओबीसी समाजाच्या मागण्या आहेत.
याबाबत तुम्ही तुमच्या मागण्या जरूर मांडा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सविधानाच्या माध्यमातून आपल्याला हा अधिकार दिला असून शांततेच्या मार्गाने आणि कायदा हातात न घेता आपल्या मागण्या मांडा. असं अजित पवार यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शब्द दिला आहे की आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे, अभ्यास सुरू आहे. राज्य सरकारचं कुठेही दुर्लक्ष झालेलं नाही किंवा होत नाही. आज या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मला हीच गोष्ट राज्यातल्या जनतेला सांगायची आहे. ज्यांच्या तोंडात आरक्षणाचा घास घातलाय त्याला धक्का न लावता इतरांनाही आरक्षण देण्याची भूमिका महायुती सरकारची आहे. असा टोला अजित पवार यांनी लगावला.