जळगाव, ता.०२ : ७२ वर्षांनंतर अमळनेर येथे मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून विविध विषयांवर मंथन होईल. यामुळे हे संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारे ठरेल, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केला. पुढच्या पिढीला आदर्श ठरेल असं देणं म्हणून हे संमेलन यशस्वीरित्या आपल्या सर्वांना पार पाडायचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंड मधील बन्सीलाल पॅलेस मध्ये आयोजित कार्यक्रमात श्री पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलिंद भामरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथे होत आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, बोधचिन्हाची निर्मिती येथील भूमीपुत्राने केली याचा माझ्यासारख्या भूमीपुत्राला अभिमान आहे. अतिशय उत्कृष्ट बोधचिन्ह तयार केले. बोधचिन्हाच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर खान्देशची प्रतिमा उमटवली आहे. बोधचिन्ह जगात नावलौकिक करेल अशी प्रत्येक गोष्ट घेतली आहे. अमळनेर सारख्या छोट्या गावात १९५२ साली साहित्य संमेलन झाले. प्रताप कॉलेज, प्रताप शेटजींनी पूर्वजांनी तत्वज्ञान मंदिराच्या माध्यमातून जगात प्रसिद्ध आहे. सानेगुरुजींची चळवळ येथून झाली याचा सर्व अभ्यास करून येथे साहित्य संमेलनसाठी परवानगी दिली. महाराष्ट्राला दिशा देणारे साहित्य संमेलन येथे होईल. असा विश्वास व्यक्त करत साहित्य संमेलन प्रत्येकाने यशस्वी करून दाखवावे. अशी अपेक्षा ही श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविक करतांना मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी म्हणाले की, ७२ वर्षांनंतर संमेलन आयोजनाचा मान आपल्याला मिळला आहे, ही संपूर्ण खान्देशसाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे सर्व खान्देशवासियांनी एकत्र येवून हा सोहळा साजरा करावयाचा आहे, असे आवाहन करत त्यांनी संमेलनाविषयी सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, माजी आमदार स्मिता वाघ, शिरीष चौधरी यांनी ही मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या बोधचिन्हात संपूर्ण खान्देशीच ओळख दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर बोधचिन्ह साकारणारे प्राचार्य मिलिंद भामरे यांनी बोधचिन्हाबाबत थोडक्यात माहिती दिली. मी अमळनेरचा आहे माझ्याकडून परमेश्वराने ही सेवा करून घेतली असे सांगितले. सूत्रसंचालन शरद सोनवणे व आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.