सांगली: अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक, मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्याध्यक्ष, तसेच जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे संस्थापक विजयसिंह महाडिक यांचे सांगली येथील त्यांच्या निवासस्थानाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ६५ वर्षीय महाडिक विविध सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभागी होते. महाडिक हे मराठा आरक्षण चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी मराठा समाजाच्या कार्याला चालना देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मराठा आरक्षणासाठी त्यांनी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांसोबत चर्चा केली होती. २००७ पासून महाडिक यांनी मराठा आरक्षणासह २७ मागण्या घेऊन सरकारवर दबाव आणला होता. २०१६ मध्ये मराठा समाजाला आरक्षणासाठी नऊ दिवस उपोषण केले होते. राज्यातील ४२ संघटना एकत्रित करून आरक्षण समन्वय समिती स्थापन केली होती.
महाडिक यांचे मराठा समाजातील योगदान आणि आरक्षणासाठीचे त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक समाजातील अनेकांनी केले. पानिपत येथे झालेल्या “शौर्य दिन” निमित्त त्यांनी सर्वांना एकत्र करून मराठ्यांची ताकद दाखवून दिली होती. मराठा आरक्षणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चळवळीत देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. महाडिक यांच्या आकस्मिक मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी मराठा समाजाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचे आणि वचनबद्धतेचे स्मरण केले आहे. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील आणि आरक्षण चळवळीतील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहणार आहे. विजय सिंह महाडिक यांचे निधन मराठा समाजासाठी एक मोठे नुकसान मानले जात आहे.