छत्रपती संभाजीनगर : आम्ही मागितलेल्या मागण्यांमध्ये सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी. सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया करावी तसेच मराठा कुणबी एकच आहेत, याबाबतचा कायदा 57 लाखांच्या नोंदींच्या आधारे करण्यात यावा. शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी, यासह 13 जुलैपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे यांनी आज मंगळवार (दि.18) रुग्णालयात मीडियाशी बोलताना मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. एकत्र नसलेला मराठा समाज एकत्र झाला आहे. आरक्षण असून ते ताकदीने लढत आहेत. आपण ताकदीनं लढलं पाहिजे, असं मनोज जरांगे म्हणाले.
आम्हाला तर आरक्षणच नाही, मग आम्ही किती लढलं पाहिजे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आरक्षण असणारे असे लढायला लागले, तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीने लढतील. माझ्या मराठ्याला आरक्षण नाही. घरात मतभेद असेल तरी ते आम्ही बाजूला ठेवू” असं मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले.
तसेच “शेतकरी, माथाडी कामगार, रिक्षावाले सगळे मराठे एक होतील. आम्हाला आरक्षणच नाही. तुम्हाला असून आम्हाला मिळू नये म्हणून इतके लढताय. मग, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून किती ताकदीने लढू. आता खानदानी मराठे मतभेद सोडून एकत्र येणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी छगन भुजबळ यांनी कायम प्रयत्न केलं आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टिका केली आहे.