पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. महिलांच्या शुभेच्छांमुळेच महायुतीचं सरकार पुन्हा निवडून आलं. मात्र, आता लाडक्या बहिणींना आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजना तात्पुरती बंद करण्यात आली होती. त्यामुळे ही योजना आता बंद होणार अशी चर्चा विरोधकांनी सुरू केली. परंतु, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महिलांना पैसे देण्यात येणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं.
आचारसंहितेदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत. ज्या ज्या महिलांचे पैसे खात्यावर आले नाहीत, त्यांचे पैसे हे डिसेंबर महिन्यात जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जातात.
डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. त्यामुळे आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता पात्र महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असंही सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, असा प्रश्न महिलावर्गाकडून विचारला जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात हस्तांतर झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 3000 आणि 7500 जमा झाले आहेत. अशाप्रकारे तब्बल 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत.