पुणे : मॉन्सूनच्या परतीचे वेध लागले असतांना राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एकीकडे राज्यात प्रचंड उकाडा सुरु असताना दुसरीकडे परतीच्या पावसाचा धुमाकूळही पाहायला मिळत आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकही हैराण झाले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका चांगलाच त्रासदायक ठरत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
याबरोबरच आज कोकणमधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.