पुणे : राज्यातील काही भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, पुण्यासह कोकण आणि विदर्भात पावसाने सरासरी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी पूर आला असून धरणांचे दरवाजे उघडले आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीचे पाणी पातळी 38 फूट आठ इंचावर आले आहे.
रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई शहर तसेच उपनगरांत रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून आज सोमवारी पहाटे देखील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील तीन चार तासांत मुंबईतील तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तसेच अकोला, अमरावती , भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली , सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली , नांदेड, लातूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, पुढील तीन चार तासांत पावसाचा जोर काही भागात आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात सध्या पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. तसेच तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असताना मोसमी वाऱ्यांचा आस दक्षिणेकडे कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा आहे याचाच परिणाम म्हणून सध्या मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.