पुणे : आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस. पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दि. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस झाला. गेल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र, त्यानंतर तापमानात वाढ झाल्याने ‘ऑक्टोबर हिट’ देखील नागरिकांनी अनुभवली.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह, हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच विदर्भासह मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि परभणी येथे आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.