पुणे : राज्यात पुढील काही दिवस वातावरणात मोठे बदल होणार आहे. गेल्या दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा ओसरला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. आजपासून पुढील चार दिवस मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान 1 ते 4 अंशाने अधिक असणार आहे.
राज्यात पुढील तीन दिवस चारही उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या दोन दिवसात म्हणजेच 24 व 25 डिसेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. व उर्वरित कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार असून पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. परिणामी इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात 24 व 25 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला ब्रेक मिळणार असून तापमानात काहीशी वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
राज्यात येत्या 24 तासात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. परंतु त्यानंतरच्या पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू दोन ते चार डिग्री चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.