पुणे : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाचा आकडा 14 अंशांहून अधिक असून, दक्षिण महाराष्ट्रासह पश्चिम पट्ट्यावर या चक्रीवादळाचे परिणाम दिसून येत आहेत. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रुपांतर फेंगल चक्रीवादळामध्ये झाले आहे. हे चक्रीवादळ शनिवारी रात्री उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरी जवळ आदळले. फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात 2 ते 4 डिसेंबर असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहिल आणि तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात आजपासून पुढचे तीन दिवस वादळी वा-यासह काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. पश्चिम महाराष्ट्रात 5 डिसेंबर रोजी यलो अलर्ट दिला आहे.
पुण्यात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअच्या जवळपास असू शकतं. पुण्यात 4 आणि 5 डिसेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.