पुणे : ऑगस्ट महिन्यात पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली पाहावयास मिळाली असताना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. हवामान विभागाने आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 3-4 दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्याचा जोर साधारण 4 सप्टेंबरपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच हिगोंलीत नदी, नाले ओढ्यांना पूर आला असून, शेतकरी, नागरिकांनी पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार देशातील 20 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.