पुणे : राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तर भारतातून थंड वा-याच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी पसरली आहे. राज्यात अनेक भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली पोहोचले. उत्तर महाराष्ट्रात तर तापमान 4-5 अंशावर पोहोचले होते.
देशातील उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. राज्यात धुळ्यासह निफाड, गोंदिया, नागपूर, वर्धा येथील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिक वाढत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कोरडं हवामान राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान पुण्यात कडाक्याची थंडी पडली असून येत्या दोन दिवसात सकाळी विरळ धुक्याची चादर पसरून येत्या दोन ते तीन दिवसात कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. दरम्यान, पुणेकरांना सध्या चांगलीच हुडहुडी भरली आहे. ठिकठिकाणी तापमान घसरल्यानं रस्त्यावर शेकाट्या पेटवून नागरिक ऊबेला बसल्याचं दिसतंय.