पुणे : गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावलेली दिसून येत आहे. पुण्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. राज्यात आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य येथे तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
राज्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस परतीचा पाऊस सुरु झाला होता. सलग चार दिवस पाऊस कोसळल्यानंतर ऑक्टोबरमध्ये मौसमी वा-यांची चाल थबकली होती. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान 36 अंशांपार गेले आहे. आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.