पुणे : राज्यातील अनेत भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. तर, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून, या भागामध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली होती. विदर्भातील अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील तीन-चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे व रायगडसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील पालघर, रायगड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.