पुणे : मागील काही दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असल्याचे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा राज्यावर मान्सून सक्रीय होणार आहे. राज्यातील काही भागात रविवार प्रमाणेच सोमवारी देखील पाऊस झाला. सोमवारी नाशिक आणि पुण्यात झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. दरम्यान, आज देखील हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाटासह हा पाऊस होणार आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज (दि.20 ऑगस्ट) कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ- मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळ आकाश राहणार असून, पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फक्त कोकणच नव्हे, तर सातारा आणि कोल्हापुरासह जळगावातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धारशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना आज मंगळवारी देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.