पुणे : देशात मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. मात्र, जाता जाता परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचे चित्र दिसत आहे. ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यातही राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यभरात दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरण दूषित झाले. या प्रदूषित हवेमुळे मुंबई आणि पुण्यात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली आहे. या सगळ्याचा परिणाम हवामानावर होताना दिसतो.
राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल लागली आहे. आज पुण्यासह, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.