पुणे : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पाऊस ये जा करीत आहे. राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
मुंबईसह उपनगरातही ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी कोसळणार आहे. पुण्यासह आजुबाजूच्या परिसरात देखील मेघदर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नाहरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील 24 तासांमध्ये राज्यात कमाल तापमान 34.5 अंशांच्या घरात पोहोचलं आहे. तर किमान तापमानातही वाढ झाली आहे. मुंबईसह रायगड आणि नजीकच्या भागांमध्येही सकाळी ऊन, दुपारी उकाडा अन् रात्री पाऊस असं हवामानाचं चित्र पाहायला मिळत असल्यामुळं अचानकच दाटून येणारे आणि बरसणारे ढग नागरिकांची तारांबळ उडवताना दिसत आहेत. तिथं विदर्भातही बऱ्याच काळानंतर आता पावसानं उसंत दिली असून, काही भागात मात्र पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी असलं तरीही ढगांची दाटी मात्र पाहायला मिळणार आहे. अधूनमधून इथंही पावसाच्या जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.
पश्चिम बंगालच्या उपसागरातील अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आज त्याच ठिकाणी स्थिर आहे. तर कोकण गोव्यात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.