पुणे : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रासह 31 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 6 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांना रेल अलर्ट जारी केलं आहे. मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणात आज व उद्या तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.