पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भयंकर थंडी आणि गारठा वाढला आहे. उत्तरेकडील शीत लहरींमुळे राज्यात पुढील चार दिवसांसाठी थंडीची लाट राहणार असल्याचे हवामान विभागांने सांगितलं आहे. राज्यातील चारही विभागातील जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान 10 अंशांच्या खाली आले आहे.
पुढील काही दिवस नाशिक, पुणे, विदर्भ, मराठवाडा या सर्व भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. उत्तर भारतात तर मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. पुण्यात पुढील तीन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 20 ते 23 डिसेंबर पर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राऊत दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत तापमान 4 ते 10 अंशापर्यंत गेले आहे. पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा जाणवत आहे. सध्या महाराष्ट्रात जाणवणारी थंडी आज टिकून राहणार आहे. नंतर तापमानात वाढ होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मंगळवारी सर्वात कमी तापमान अहिल्यानगर येथे 5.6 अंश इतके नोंदवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये पुढील 5 ते 6 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात 3 ते 4 डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे.