पुणे : राज्यातील काही भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ‘ऑक्टोबर हीट’चा दणका सहन करता-करता शेवटच्या आठवड्यात पारा घसरल्याने थंडीची चाहूल जाणवत आहे. परतीच्या पावसाने रजा घेतल्याने वातावरणात बदल घडला आहे. अशातच मुंबई आणि पुण्यामध्ये हवेची गुणवत्ता खराब झाली आहे.
राज्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी वाढू लागली आहे. ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात पहाटे गारवा जाणवत आहे. तर रात्री सुद्धा गारठा वाढला आहे. दिवसभर मात्र, तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाण्यात मात्र, तापमान वाढलेले आहे. मुंबईत कोरडं व उष्ण हवामान असल्याने तापमानात वाढ जाणवत आहे. त्यामुळे गुलाबी थंडी कधी पडणार ? या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत. त्यांना या साठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
सध्या पुण्यात हवामान कोरडे असून आकाश निरभ्र राहत आहे. तर सकाळी धुके पडत आहे. आजही राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता कमीच आहे. कोरड्या हवामानासह निरभ्र आकाश राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.