पुणे : राज्यातील एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला होता. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून एसटी कामगार कृती समिती कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात, एसटी कर्मचारी संघटना कृती समितीसह बैठक पार पडली. या बैठकीत अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांची दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु केलं होतं. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली होती. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरु झालेल्या संपक-यांची दोन दिवस कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आगारातील सर्व गाड्या बंद ठेवण्यात आल्या. यामुळे गावखेड्यात महत्त्वाची वाहतूक सेवा असणारी एसटी सेवा प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एसटी कर्मचा-यांच्या कृती समितीला बोलवून मागण्या मान्य केल्या. संप मागे घेतल्याने राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.