पुणे : राज्यात सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे कोकणासह घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 48 तासांपासून अनेक भागांमध्ये पाऊस सुरुच असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ओढे, नाले आणि डोंगरांवरून खळाळून वाहणारे धबधबेसुद्धा प्रवाहित झाले आहेत.
राज्यभरात विशेषतः कोकणामध्ये दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट असून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, सांगली, सोलापूरला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस मुंबईत पडला आहे. मुंबईत आज (14 जुलै) पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. मुंबईत आज सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झालं आहे. शनिवार मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. आठवडाभर असा पाऊस राहील असा देखील अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.