पुणे : राज्यात पाऊस पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. पुढील 24 तासांचा अंदाज घ्यायचा झाल्यास राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र आज 26 ऑगस्ट रोजी राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
आज पालघर, रायगड, रत्नागिरीला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा, नंदूरबार जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात मागच्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत 60 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून 63 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भीमा व नीरा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील चार दिवसांसाठी पावसाचा जोर अधिक राहणार असून, काही जिल्हे मात्र यास अपवाद असतील. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या मुंबई आणि पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.